Gaan Veer - Kaavyaache Title Image of a feather with an ink bottle
मुख्य पृष्ठ कलाकार गीते चित्र दालन अभिप्राय

'गान वीर-काव्याचे' : स्वा. सावरकरांच्या कवितांचा सुरेल अविष्कार

काव्य: स्वातंत्र्यवीर सावरकर
संगीत : उपासक
सं. संयोजन: श्री. अजय जोगळेकर
निवेदन: श्री. विद्याधरपंत नारगोलकर

गायन: पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर, श्री. रविंद्र साठे, श्री. सुरेश बापट, सौ. माधुरी करमरकर, सौ. वैशाली माडे, कु. मृदुला तांबे, कु. प्रीति ताम्हनकर आणि कोरस.

गीतसंग्रहामागची संकल्पना :

गेल्या वर्षी, स्वा. सावरकरांच्या मार्सेलिस बंदरातील ऐतिहासिक उडीला १०० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने, पुण्यातील माझ्या काही सावरकरप्रेमी मित्रांनी एकत्रित येऊन सावरकरांचे साहित्य, त्यांची काव्य-प्रतिभा आणि त्यायोगे त्यांचे विचार आणि धारणा अधिकाधिक लोकांपर्यंत कसे पोहोचवता येतील याचा विचार केला. आणि त्यातूनच या प्रकल्पाची कल्पना पुढे आली.

कविता जेव्हा गीत बनते, तेव्हा ती अधिक प्रभावीपणे सामान्यांपर्यंत पोहोचते ही गोष्ट सर्वज्ञात आहे. याचा विचार करून, असा संकल्प केला की सावरकरांच्या काही कविता, ज्या अगोदरच तितक्याशा प्रसिद्ध नाहीत, स्वरबद्ध करून त्यांची गीते बनवावीत व असा एक गीतसंग्रह प्रकाशित करावा. पुण्यातील सावरकर स्मृती प्रतिष्ठान चे महामंत्री श्री. विद्याधरपंत नारगोलकर यांच्याशी संपर्क साधला व त्यानी या प्रकल्पाला लगेचच मनापासून पाठिंबा दर्शविला आणि गीतांमधील निवेदन संहिता आणि प्रत्यक्ष निवेदनाची जबाबदारी देखील उचलली.

सावरकरांच्या समग्र कविता पाहिल्या तर त्यांचे भाषेवरील, व्याकरणावरील असामान्य प्रभुत्व तर लक्षात येतेच, शिवाय त्यांनी हाताळलेले असंख्य कविता प्रकार आणि विविध वृत्तांचा वापर पाहून अचंबित व्हायला होते. ह्यातील काही गीतांचे ध्वनीमुद्रण झाल्यावर ती आम्ही काही सावरकर प्रेमी मंडळींना ऐकवली आणि आमच्या असं लक्षात आलं त्यातील अनेकांना देखील सावरकरांनी ’लावणी’ लिहिली होती हे माहिती नव्हतं.. अर्थात ही सावरकरांनी लिहिलेली लावणी आहे त्यामुळे त्याच्या मागचे विचार आणि त्यानी योजलेलं त्यातलं रूपक हे आपल्याला ती ऐकल्यानंतरच लक्षात येईल आणि या लावणी चं वेगळेपण जाणवेल..

’जय हेरंब’ या माझ्या पहिल्या गीतसंग्रहाच्या संगीत दिग्दर्शनानंतर, या गीतसंग्रहाचे संगीत दिग्दर्शन करण्याची जबाबदारी मला मिळाली हे मी माझं मोठं भाग्य समजतो. या निमित्ताने सावरकरांच्या कवितांच्या अभ्यास करण्याची संधी आणि प्रोत्साहन लाभले. त्यांच्या उत्तुंग, विविधांगी व्यक्तिमत्वातील साहित्यप्रतिभा आणि त्यांच्या विचार धारणेचे, स्वल्प का होईना, दर्शन घडले आणि आकलन करण्याची संधी मला लाभली. कवितेतील शब्द आणि भावनांना समर्पक अशी चाल द्यायचा मी प्रयत्न केला आहे.

या गीतसंग्रहामधे अर्थातचं अनेकांचं योगदान आहे. मुंबईचे प्रसिदध हार्मोनियम वादक आणि संगीत संयोजक श्री. अजय जोगळेकर यांनी या संग्रहाचे संगीत संयोजन केले आहे. गायन क्षेत्रातील प्रसिद्ध पद्मश्री पद्मजा फेणाणी, श्री. रविंद्र साठे, श्री. सुरेश बापट, सौ. माधुरी करमरकर, सौ. वैशाली भैसने-माडे यांनी यातील गीते गायिली आहेत. याशिवाय पुण्याची तरूण उभरती गायिका कु. मृदुला तांबे, आणि कॅलिफोर्नियातील बाल कलाकार कु. प्रीति ताम्हनकर यांनीही गीते गायली आहेत. शिवाय, आधी नमूद केल्यानुसार सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे महामंत्री श्री. विद्याधर पंत नारगोलकर यांनी निवेदन केले आहे.

या गीतसंग्रहाचे जागतिक प्रकाशन ३ सप्टेंबर २०११ रोजी, शनिवारी, भारतातील सकाळी ११ वाजता झाले. पुण्याच्या पत्रकार भवन मधील ’कमिन्स’ सभागॄहामधे आणि ’मिल्पिटास कॅलिफोर्निया’ मधील STSUC (Sharadbhau Tamhankar Sangeet Upaasanaa Center) येथे एकाच वेळी, एकत्रित रीत्या हे प्रकाशन करण्यात आले. पुण्यात प्रसिद्ध अभिनेते, विचारवंत आणि सावरकर प्रेमी श्री. शरद पोंक्षे यांच्या हस्ते, तर अमेरिकेत, प्रसिद्ध हिंदुस्थानी गायिका, विदुषी डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांच्या हस्ते हा अनावरण समारंभ पार पडला. यावेळी ’video conferencing technology' चा उपयोग करून हा समारंभ एकत्रित रीत्या संपन्न झाला.

रसिक श्रोत्यांना या गीतसंग्रहामधील गीते निवेदनासह नक्कीच भावतील अशी खात्री आहे आणि स्वा. सावरकरांची काव्य-प्रतिभा आणि त्यांची विचार-धारणा त्यांच्या पर्यंत पोहोचविण्याचा आमचा हेतू सफल होईल अशी आशा आहे. या गीतसंग्रहाच्या विक्रीतून होणारा सर्व फायदा हा सामाजिक कार्य, स्वा. सावरकरांचे विचार पुस्तिका वाटप, सावरकरांच्या जीवनावर लहान मुलांकरिता Animation Video निर्मिती इत्यादि करिता वापरण्यात येणार असून त्यात कोणताही व्यावसायिक हेतू नाही हे मी परत एकदा नमूद करू इच्छितो. तरी रसिकांनी या प्रकल्पास भरभरून पाठिंबा द्यावा अशी नम्र विनंती...

- उपासक

गीतसंग्रहातील गाण्यांची झलक

छंद नसे चांगला
हे सदया गणया तार
हिंद सुंदरा ती
स्वदेश हिंदुस्थान
पहिला हप्ता
मला देवाचं दर्शन घेऊ द्या
माळ गुंफिताना

हा गीतसंग्रह खरेदी करण्यासाठी कृपया खालील गूगल बटनचा वापर करा. धन्यवाद!

If you do not have access to Google Checkout, you can use this order form to place your order with us. We will follow-up with you as soon as possible.


जय हेरंब प्रॉडक्शन्सची इतर निर्मिती

जय हेरंब


Upcoming concerts...